कपिल राऊत, झी २४ तास, ठाणे : कोरोनामुळं लॉकडाऊन झालं आणि अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. नोकऱ्या गेल्या, कामधंदे बंद पडले... अनेकजण मानसिक रोगी बनले. त्यापैकी कित्येकजण घर सोडून निघून गेले.कोरोनामुळं अनेकांची वाताहत झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनानं लोकांच्या आयुष्यात काय उलथापालथ केली, याचं भयानक चित्र आता समोर येतंय.. कोरोनामुळं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कामधंदे बंद पडले. त्याचा परिणाम म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं.. यापैकी अनेक व्यक्ती घरदार सोडून बेपत्ता झाल्या. 


2020 मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तब्बल 3 हजार 194 व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या. म्हणजेच दिवसाला सरासरी 5 महिला आणि 3 पुरूष बेपत्ता झाले. 



त्यापैकी 1 हजार 508 जण घरात काहीही न सांगता निघून गेले.
प्रेम प्रकरणातून घर सोडणाऱ्यांची संख्या 183 होती. तर कौटुंबिक वादातून 23 जण घर सोडून गेले. उर्वरित 1 हजार 480 जण इतर कारणांमुळं बेपत्ता झाले, असं आकडेवारी सांगते.


पण कोरोनामुळं झालेला मानसिक त्रास आणि जडलेले मानसिक विकार हेच अनेकांच्या बेपत्ता होण्यामागचं खरं कारण असल्याचं पोलीस सांगतात.


बेपत्ता झालेल्यांपैकी 1 हजार 797 लोक सापडले. तर 1 हजार 397 लोक अजूनही बेपत्ता आहेत. कोरोनामुळं मानसिकदृष्ट्या खचलेल्या लोकांचं मनोधैर्य उंचावण्याचं काम आता मानसोपचारतज्ज्ञांना करावं लागतंय... 


केवळ डॉक्टर आणि पोलिसांवर ही जबाबदारी टाकून भागणार नाही. तर कोरोनामुळं उद्धवस्त झालेल्या लोकांसाठी समाजानंही मदतीचा हात पुढं करण्याची गरज आहे.