मुंबई : मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला 7 ते 8 हजार कोरोना रुग्ण वाढत होते. मात्र आता हा आकडा 35 ते 40 हजार इतका झाला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर येत्या 10 एप्रिलपर्यंत कोरोना रुग्णसंख्या दिवसाला 60 ते 65 हजारांच्या घरात जाण्याची भीती आहे. राज्याच्या कोविड टास्क फोर्सच्या बैठकीतही येत्या 10 दिवसांमध्ये राज्यात ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर्सची टंचाई जाणवण्याची भीती आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे झाले तर मृत्यूचा दर आणखी वाढू शकतो. वाढत्या संसर्गामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडतो. दुसरी लाट ग्रामीण भागात जास्त तीव्र असून तिथं आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय.


त्यामुळे ग्रामीण भागात ई-आयसीयूवर भर देण्यात यावा, अशा सूचना टास्क फोर्सनं केल्या आहेत. 


संपूर्ण राज्याचा विचार केला तर मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमध्ये सध्या बेड्सचा दुष्काळ जाणवतोय..


इतर शहरांमध्ये  सध्यातरी बेड्सची टंचाई नाही. मात्र बेसावध राहणं धोक्याचं ठरू शकतं. गेल्या महिन्याभरातील राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचे आकडे बघितले, तर स्थिती किती भीषण आहे, याचा अंदाज येऊ शकेल. 



गेल्या १ मार्चला राज्यात ७७ हजार अॅक्टिव्ह केसेस होत्या.


  • १० मार्चला हा आकडा ९९ हजारांवर गेला.

  • २० मार्चला राज्यात १ लाख ९१ हजार रुग्ण कोरोनाग्रस्त होते. 

  • तर ३० मार्चला हा आकडा तब्बल साडेतीन लाखांवर गेला.

  • हाच वेग राहिला तर १० एप्रिलपर्यंत राज्यात ६ लाखांवर अॅक्टिव्ह रुग्ण असतील, अशी शक्यता आहे.



स्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल, तर प्रशासनाबरोबरच जनतेनंही सावध राहण्याची गरज आहे. केवळ रात्रच नाही, तर दिवसही कोरोना नावाच्या वैऱ्याचे आहेत. यातून जेवढं लवकर बाहेर पडू, तेवढं बरं