शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्याच्या सारोळा येथे भोंदू बाबाच्या संपर्कात आलेल्या २० जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. औसा तालुक्यातील सारोळा गावातील काही जण देवीची परडी भरण्याच्या कार्यक्रमासाठी एका आराद्याकडे गेले होते. तो आरादी गावातील एका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतरही त्याने परडी भरण्याच्या कार्यक्रमातून ‘सकून’ पाहून लिंबू आणि कुंकवावर फुंकर मारून त्याचा प्रसाद अनेकांना दिला. देवीचा प्रसाद समजून अनेकांनी ते लिंबू खाल्ले. त्यानंतर दोन दिवसांनी तो भोंदू बाबा कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या तीन कुटुंबांतील वीस जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. 


'सकून' बघण्यासाठी त्या भोंदू बाबाने तोंडावाटे फुंकर मारून लिंबू आणि कुंकू भाविकांना खायला दिल्याच्या अघोरी प्रकारामुळेच सर्वांना कोरानाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सारोळ्याच्या पोलीस पाटील यांनी औसा पोलीस ठाण्यात त्या भोंदूबाबाविरुद्ध तक्रार दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, लातूरमध्ये आतापर्यंत 493 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 252 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या लातूरमध्ये 214 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे.