दुकानदार-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, अन्यथा महापालिकेचा कारवाईचा इशारा
चाचणी न करता व्यापार सुरू करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचा इशारा
अकोला : अकोल्यात सर्व व्यापार सुरू करण्यासाठी व्यापारी आणि प्रतिष्ठानांमधील कामगारांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. चाचणी न करता व्यापार सुरू करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे कोरोना चाचणीसाठी व्यापाऱ्यांची मोठी गर्दी सर्व केंद्रांवर झाली होती. ही बातमी 24 तासवर प्रसारित झाल्या नंतर प्रशासनाने याच गांभीर्य ओळखून अधिक चार केंद्र सुरू केले आहे.
अकोल्यात 8 मार्चपर्यंत जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये बदल करण्यात आले मात्र दुकानदारांना आणि त्यांच्याकडे कामावर असलेल्या व्यक्तींना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. महापालिकेने चाचणी न करता व्यापार सुरू करणाऱ्या दुकान मालकांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. आतापर्यंत महापालिकेने कोरोना चाचणी न करता दुकान उघडणाऱ्या शहरातील ४० व्यापाऱ्यांवर कारवाई केली आहे.
मात्र व्यपाऱ्यांनी या कारवाईला विरोध केला होता, व्यापाऱ्यांना तीन दिवसांची मुभा देण्याची विनंती सुद्धा करण्यात आली होती. अकोल्यात ०९ ही कोरोना चाचणी केंद्रांवर यामुळे मोठी गर्दी झाली होती या संदर्भात झी 24 तास ने व्यापाऱ्यांची होणारी अडचण आणि असुविधे बद्दल बातमी प्रसारित केली होती. या गंभीर विषयाची दखल घेत अकोल्यात अधिक चार ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांची होणारी गर्दीला अटकाव बसला आहे.नागरिकांनी या संदर्भात झी 24 तासाचे आभार मानले आहेत.