ठाणे : शहरातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने  प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोनाची चाचणी घेण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता ठाणेकर नागरिकांना सहजपणे कोरोनाची चाचणी करता यावी यासाठी राज्याचे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या पुढाकाराने महापालिका, इन्फेक्शन लॅब या आयसीएमआर प्राधिकृत लॅबच्या माध्यमातून ठाण्यात ड्राईव्ह थ्रूच्या माध्यमातून नागरिकांसाठी टेस्टींग सुविधा सुरु करण्यात आली आहे.           


 स्वॅब टेस्टींगची सुविधा     


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅडबरी जंक्शन आणि कळवा नाका येथे इन्फेक्शन लॅबच्या माध्यमातून ड्राईव्ह थ्रू पद्धतीने स्वॅब टेस्टींगची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नागरिकांना स्वॅब तपासणीसाठी आता कुठल्याही लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. ॲानलाईन नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वेळेत जाऊन कोरोनाची चाचणी करता येणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे चाचणी केल्यानंतर २४ तासांत त्या चाचणीचा अहवाल संबंधित व्यक्तींस ॲानलाईन पद्धतीनेच प्राप्त होणार आहे.


ऑनलाईन नोंदणी आणि रिपोर्टही


या तपासणी केंद्रात तज्ज्ञ डॉक्टर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रशिक्षीत कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. सकाळी १० ते  सायंकाळी ६ या वेळेत ही चाचणी करण्यात येते. दरम्यान तपासणीसाठी येताना ऑनलाईन नोंदणीची आणि पैसे भरल्याची पावती घेवून स्वत:च्या बंदिस्त चारचाकी वाहनातूनच त्यांना बूथवर येणे अनिवार्य असणार आहे.  या व्यक्तीचे त्याचे बंद वाहनातच स्वॅब घेण्यात येतात. तपासणीनंतर त्याचा अहवाल त्या व्यक्तीस तसेच ठाणे महापालिकेस ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. या उपक्रमास ओबेराय रियॅलिटी यांनी सहकार्य केले आहे. इन्फेक्शन लॅबचे डॉ. सचिन भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.