कल्याण : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एक-एक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. कल्याणमध्ये एक महिला तर डोंबिवलीत एका मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, तुर्कस्तानहून आलेला कोरोना बाधित रुग्ण लग्न आणि हळदीला उपस्थित राहिल्याने कल्याणमध्ये कोरोनाने प्रवेश केल्याची माहिती आहे. तुर्कस्तानहून आलेला बाधित तरुण तुर्कस्तानहून आल्यानंतर, डोंबिवलीत लागण झालेल्या मित्राच्या घरी गेला होता, तसंच हा मित्रही बाधित तरुणाच्या घरी गेला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता डोंबिवली आणि कल्याणमधील या नव्या रुग्णावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता १२ वर पोहचला आहे. तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.


दरम्यान, यापूर्वी याच तुर्कस्तानमधून आलेल्या तरुणामुळे ६० वर्षीय महिला आणि तिच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. 


15 मार्च रोजी तुर्कस्तानवरुन डोंबिवलीत आलेल्या २६ वर्षीय तरुणाला होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचं सांगण्यात आलं होतं. पण या तरुणाने क्वारंटाईनमध्ये न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि  लग्नसोहळयात हजेरी लावली होती. त्यानंतर तो तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं पुढे आलं. या तरुणासह दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करु नका, ठरलेले कार्यक्रम रद्द करा किंवा पुढे ढकला, अशा सूचना राज्य सरकारकडून देण्यात येत होत्या. मात्र, तरीही या सूचनांकडे दुर्लक्ष करत या तुर्कस्तानातील तरुणांने अनेकांचा जीव धोक्यात घालत लग्नसमारंभात सहभाग घेतला होता.