औरंगाबाद : कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत १ हजार कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद येथील दिलीप लुनावत यांनी ही याचिका दाखल केली आहे. लुनावत यांची मुलगी स्नेहल ही नाशिकला एमबीबीएस करत होती. स्नेहल हिने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना लसीची मात्रा घेतली. या लसीच्या दुष्परिणामांमुळे 1 मार्च 2021 रोजी तिचा मृत्यू झाला.


कोरोनावरील लस सुरक्षित असल्याचे खोटे आश्वासन भारतीय औषध महानियंत्रक (डीसीडीआय), अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संचालक तसेच केंद्र व राज्य सरकारने दिले. तसेच, आरोग्य क्षेत्राशी संबंधितांना कोरोना लसीच्या मात्रा घेण्यास भाग पाडण्यात आले.


स्नेहल हिला गेल्या वर्षी जानेवारीमध्ये कोविशील्ड लस देण्यात आली. लस देण्यापूर्वी ती सुरक्षित होती. पण, लस दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. सरकारच्या खोट्या आश्वासनाला बळी पडल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत लुनावत यांनी 1 हजार कोटींच्या नुकसान भरपाईसाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.


केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे. आपल्या मुलीचा मृत्यू कोव्हिशिल्ड लसमात्रेच्या दुष्परिणांमामुळे झाल्याचे केंद्र सरकारच्या लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांच्या अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समितीने मान्य केल्याचा दावाही याचिका कर्त्यांनी केला आहे. 


ही याचिका आपण आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बेफिकीर सरकारी यंत्रणांपासून लोकांचे प्राण वाचवण्यासाठी केल्याचे याचिकाकर्ते दिलीप लुनावत यांनी म्हटलं आहे.