मुंबई : राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ८०९ रुग्ण आहेत. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ४९१ एवढी आहे, तर ५६ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचा दर हा ५ टक्के आहे, पण २.५ ते ३ टक्के मृत्यू होतील, असा आमचा अंदाज होता, असं वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सर्व मिळून १८०० व्हॅन्टिलेटर उपलब्ध आहेत. ८०९ पैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना व्हँटिलेटरची गरज आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्य सरकारकडे ३७ हजार पीपीई उपलब्ध आहेत, तसंच मास्कही काही प्रमाणात आहेत. हे मास्क कोव्हिड रुग्णालयांना पुरवण्यात आले आहेत, असं राजेश टोपे म्हणाले.


केंद्र सरकारने आज आम्हाला पत्र पाठवलं आहे. कोणत्याही राज्य सरकारने पीपीई, एन ९५ मास्क, व्हँटिलेटर खरेदी करु नये, त्यामुळे या तिन्ही गोष्टींची मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. राज्याने केंद्राकडे २,१२५ व्हँटिलेटर, ८,४१,५०० मास्क आणि ३,१४,००० पीपीई मागितले आहेत, असं राजेश टोपेंनी सांगितलं.


सगळ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट आणि एन-९५ मास्क मिळावं, अशी आमची मागणी आहे. केंद्राने सांगितल्यामुळे आम्ही हे खरेदी करु शकत नाही. या सगळ्या गोष्टी केंद्र सरकार राज्याला देणार असा निर्णय केंद्राने घेतला आहे, अशी प्रतिक्रिया टोपेंनी दिली.


Corona : राज्यातला लॉकडाऊन वाढणार का? आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य