कोरोनाचे काँग्रेसच्याच मुख्यमंत्र्यांचे आरोप अशोक चव्हाणांनी फेटाळले
कोरोना व्हायरसवरून काँग्रेसच्याच दोन दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
नांदेड : कोरोना व्हायरसवरून काँग्रेसच्याच दोन दिग्गज नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलेले आरोप अशोक चव्हाणांनी फेटाळून लावले आहेत. नांदेडहून पंजाबला गेलेल्यांना प्रवासामध्ये कोरोना झाल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे. गुरुद्वारामधल्या २० सेवादरांचा संसर्गही जुना नसून मागच्या काही दिवसातलाच आहे, असंही चव्हाण म्हणाले.
नांदेडवरून पंजाबला परतलेल्या भाविकांची चाचणी झाली होती. तसंच या भाविकांमध्ये कोणतीही लक्षणं दिसून आली नव्हती. लक्षणं दिसून आली असती, तर गुरुद्वारा प्रशासनाने त्यांची चाचणी केली असती आणि त्यांच्यावर उपचार केले असते, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
काय म्हणाले अमरिंदर सिंग?
पंजाबमध्ये कोरोनाची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र सरकार नांदेडमध्ये अडकलेल्या भक्तांच्या कोरोना टेस्टवरून आमच्याशी खोटं बोललं. आम्ही भाविकांच्या कोरोना टेस्ट केल्या असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. आम्हाला माहिती असतं, तर आम्ही नक्कीच टेस्ट केल्या असत्या, असं अमरिंदर सिंग म्हणाले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली. यानंतर ८० बस आम्ही नांदेडच्या हुजुर साहिबला पाठवल्या. आम्हाला वाटलं तिकडे १५०० भक्त असतील, पण बस तिकडे पोहोचल्या तेव्हा ३ हजारांपेक्षा जास्त जण असल्याचं समजलं. आतापर्यंत ७ हजारांपेक्षा जास्त जण नांदेडहून पंजाबला परतल्याची माहिती अमरिंदर सिंग यांनी दिली.
प्रत्येक दिवशी आम्ही १५०० टेस्ट करत आहोत. एवढ्या जणांच्या टेस्ट करायला वेळ लागत आहे आणि खर्चही जास्त होत आहे. या भाविकांना आम्ही क्वारंटाईन केलं, असल्याचंही अमरिंदर सिंग म्हणाले.
शुक्रवारी पंजाबमध्ये कोरोनाचे १०५ नवे रुग्ण आढळले, यातले ९१ रुग्ण नांदेडमधून परतल्याचा दावा पंजाब सरकारने केला आहे. पंजाबमध्ये तीन ठिकाणांहून कोरोना आल्याचंही पंजाब सरकारचं म्हणणं आहे. सुरुवातीला एनआरआयकडून मग निजामुद्दीनच्या तबलिगींकडून आणि राजस्थान तसंच महाराष्ट्रातून आलेल्यांकडून कोरोना पंजाबमध्ये आल्याचं कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले.