मुंबई : देशभरातालं कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला. भारतातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. यानंतर आता काँग्रेसने मोदींच्या या घोषणेवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना सामान्य माणसाचे महत्वाचे प्रश्न अनुत्तरीतच आहेत. गरीब आणि मजूर वर्गाचे पोट भाषणाने भरणार नाही, त्यांना राशन हवे आहे. त्यांना रोख आर्थिक मदत देण्याबाबत पंतप्रधान चकार शब्दही बोलले नाही', असं ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.



'छोटे व्यावसायिक, शेतकरी सारेच त्रस्त आहेत, अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे, तिला गोड शब्दांपेक्षा आर्थिक मदतीची आणि धोरणी भूमिकेची गरज आहे. त्यामुळे पंतप्रधान जरी बऱ्याच दिवसानंतर मुद्द्याचं बोलले असले तरीही, त्यातून महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत', अशी टीका थोरात यांनी केली आहे.


कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी राज्यांना केंद्राकडून पुरेसे PPE कीट आणि वैद्यकीय साहित्य मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. केंद्र सरकार राज्यांना PPE कीट खरेदी करू देत नाही आणि पुरवठाही करत नाही. त्यामुळे डॉक्टर व कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा मुद्दा थोरात यांनी मांडला आहे.