औरंगाबाद: सध्या चीनमध्ये हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसचा मोठा फटका औरंगाबादला बसला आहे. जगभरात या व्हायरसची दहशत पसरल्याने औरंगाबादमधील पर्यटन व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. एलोरा, अजिंठा, बिबी का मकबरा यासारख्या पर्यटनस्थळांमुळे औरंगाबाद हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. दरवर्षी हजारो परदेशी पर्यटक औरंगाबादेत येतात. मात्र, यंदा कोरोना व्हायरसच्या प्रभावामुळे परदेशी पर्यटकांची संख्या कमलीची घटली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास ४० टक्के परदेशी सहलींचे बुकिंग रद्द झाले आहे. परदेशी पर्यटकांनी पाठ फिरवल्याने पंचतारांकित हॉटेलचा व्यवसाय मंदावला आहे. याचा फटका टूर आणि ट्रॅव्हल्स कंपन्यानाही बसला आहे. नोव्हेंबर ते मार्च या काळात ऊन कमी असते म्हणून विदेशी पर्यटकांचा हा सिझन असतो. मात्र, यावेळी विदेशातील पर्यटक मंदावल्याने मोठं नुकसान पर्यटन व्यावसायिकांना सहन करावे लागत आहे.



चीनमध्ये करोनाचे १६०० बळी


चीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाल्याने आतापर्यंत सोळाशे जणांचा मृत्यू झाला आहे. हुबेई प्रांतात काल एकाच दिवसांत १३९ जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या चीनमधल्या रुग्णांची संख्या जवळपास ७० हजारांवर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या हुबेई प्रांतात शनिवारी १३९ जणांचा बळी गेला.


करोना विषाणूच्या हल्ल्यासमोर चीन हतबल झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ६८ हजार ५०० जणांना करोनाची लागण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरही करोनाचा परिणाम होत आहे. आतापर्यंत आरोग्य विभागातील १७०० जणांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे.