अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत एकमत झालं. 


उपमुख्यमंत्री आणि वारकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या या बैठकीत आषाढी वारी कशी पार पाडायची आणि आळंदी आणि देहूवरून पादुका पंढरपूरला कशा न्यायच्या याबाबत आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी,  देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या.  यावेळी वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या.  त्यानंतर आळंदी आणि देहूवरून निघणाऱ्या पादुका हेलिकॉप्टर , एस टी किंवा विमानाने  पंढरपूरला नेण्यात याव्यात अशी भूमिका  मांडण्यात आली.