लॉकडाऊनमध्ये राज्यात ६० हजार गुन्हे, १३ हजार जणांना अटक
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये राज्यात कलम १८८ नुसार ६०,००५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर १३,३८१ जणांना अटक करण्यात आली आहे. ४१,७६८ वाहनं लॉकडाऊनमध्ये जप्त करण्यात आली. २२ मार्च ते २० एप्रिल या कालावधीतली ही आकडेवारी आहे. राज्याच्या पोलीस विभागाने ही माहिती दिली आहे.
पोलीस विभागाच्या १०० नंबरवर राज्यभरात ७५,११५ फोन आले. तर पोलिसांनी क्वारंटाईनचा शिक्का असणाऱ्या ५८९ व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं. लॉकडाऊनच्या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १,०६२ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघन केल्याप्रकरणी १५ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
लॉकडाऊनच्या कालावधीत वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून २ कोटी ३० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये पोलिसांवर हल्ला करण्याच्या १२१ घटना घडल्या, यामध्ये ४११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्र सायबर विभागाने लॉकडाऊनच्या काळात २५१ गुन्हे दाखल केले आणि ५० आरोपींना अटक केली. टिकटॉक, फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात सायबर विभागाने ही कारवाई केली आहे.