`नातेवाईक-मित्रांना भेटा, बाहेर पडा`, कोरोनाच्या संकटात प्रकाश आंबेडकरांचा सल्ला
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमध्ये गरज नसताना घराबाहेर पडू नका, तसंच कमीत कमी व्यक्तींच्या संपर्कात या, असं आवाहन करण्यात येत आहे. पण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मात्र नातेवाईक आणि मित्रांना भेटा, असा सल्ला दिला आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही, तर लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून लोकांची सुटका झाली पाहिजे. सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून राहू नये. नागरिकांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पाहिजे, त्यासाठी नागरिकांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेटायला सुरवात करा, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
या देशात अनेक व्हायरस येऊन गेले. आपण त्यांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे. कोरोना व्हायरसला सुद्धा आपण तोंड देऊ, त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
कोरोना व्हायरसबाबत येत असलेल्या बातम्या दिल्या जात आहे, शासनही कार्यक्रम आखत आहे. कदाचित तो खरादेखील असेल, पण आता लोकांची सुटका झाली पाहिजे. नागरिकांनी मित्रांना आणि नातेवाईकांनाही भेटायला सुरुवात करा. आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला जा, यामुळे शासनाने आपल्या मनात घातलेली भीती कमी व्हायला सुरूवात होईल, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.