मुंबई : राज्यामध्ये गेल्या २४ तासात कोरोनाचे २,६०८ रुग्ण वाढले आहेत. एकट्या मुंबईमध्येच कोरोनाग्रस्तांची संख्या १,५६६नी वाढली आहे. यामुळे राज्यातला कोरोनाग्रस्तांचा आकडा ४७,१९० एवढा झाला आहे, तर १,५७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एका दिवसात कोरोनाच्या ६० रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात आज ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १३ हजार ४०४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ३२ हजार २०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 


आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मध्ये ४०, पुण्यात १४,  सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साता-यात १, ठाणे १ तर नांदेड शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासातील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवडयातील आहेत. 


आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१  पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६० मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९  रुग्ण आहेत, तर २४  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये ( ६० टक्के)  मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.