मुंबई : महाराष्ट्र सरकार कोरोना व्हायरसची तीव्रता दडपत आहे. ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, अशा संशयित रुग्णांची टेस्ट करण्यास नकार दिला जात आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातलं शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार कोरोनाच्या संकटाला योग्य पद्धतीने हाताळत नाहीये, याची किंमत राज्यातल्या जनेतला चुकवावी लागत आहे, असंही फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पीटीआयला मुलाखत दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'संकटाच्या काळात सत्ताधारी आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये ताळमेळ नाही. तसंच सरकारमधल्या मंत्र्यांमध्येही सुसंवाद नाही. राज्य सरकार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दडपत आहे. सरकारने ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत, अशा रुग्णांची टेस्ट करणं थांबवलं आहे,' असं फडणवीस म्हणाले.


राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८ हजारांच्यावर गेला आहे. तर देशातही महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक ३४२ मृत्यू झाले आहेत. राज्य सरकार या संकटाची सत्य परिस्थिती सांगत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावच्या कब्रस्तानाचा उल्लेख केला. मागच्यावर्षीच्या तुलनेत मागच्या २ महिन्यात मालेगावच्या कब्रस्तानात जवळपास दुप्पट जणांचं दफन झालं आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


'मालेगावच्या कब्रस्तानात मार्च आणि एप्रिल महिन्यात ४८५ मृतदेह दफन करण्यात आले. मागच्यावर्षी याच कालावधीत ही संख्या २५१ होती. देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असताना, या सगळ्या गोष्टी कोरोनाच्या संकटाची सत्य परिस्थिती लपवण्यासाठी केल्या जात आहेत,' असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.


संशयित रुग्णांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना कोणतीही टेस्ट न करताच देण्यात आल्याचा गंभीर आरोपही फडणवीस यांनी केला आहे. 'मुंबईच्या धारावी झोपडपट्टीमध्ये २०० जणांना कोरोना झाला आहे. या २०० व्यक्ती २ हजार जणांच्या संपर्कात आल्या. संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या टेस्ट राज्य सरकार करत नाही. धारावीतल्या लोकांचा जीव धोक्यात का टाकला जात आहे?' असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला आहे. 


'राज्य सरकार लॉकडाऊनमध्ये मजूर आणि कामगारांची काळजी घेण्यात अपयशी ठरलं आहे, त्यामुळे त्यांच्यात रोश आहे. राज्य सरकारला रेशन कार्ड धारकांना रेशन द्यायची सोय करता आली नाही. सरकारने ३ कोटी लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात रेशन दिलं नाही,' असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.