मुंबई : कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. पंतप्रधानांसोबतच्या या चर्चेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. पंतप्रधानांशी बोलताना शरद पवार आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्यपाल समांतर सरकार चालवत असल्याचा मुद्दा मीच नरेंद्र मोदी यांच्यासमोर उपस्थित केला. शरद पवारांनीही त्याचं समर्थन केलं. निर्णय घेण्याचं केंद्र एकच असावं. राजभवनातून वेगळ्या सूचना करणं, माहिती घेणं सुरू आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाशी डिल करु नये. हा मुख्यमंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप आहे. यामुळे कुणाचं ऐकायचं? यावरून प्रशासनात गोंधळ निर्माण होतोय. राज्यपालांनी शिष्टाचार पाळावा,' असं संजय राऊत म्हणाले आहेत.


'राज्य सरकार आमदारांना पगार देतं, तसंच राज्यपालांनाही वेतन देतं. त्यामुळे त्यांनी सीएम रिलीफ फंडात मदत करायला हवी. यातून त्यांचा महाराष्ट्राविषयी आकस दिसून येतो,' असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 




शरद पवारांनीही पंतप्रधानांशी बोलताना राज्यपालांच्या भूमिकेविषयी आक्षेप घेतल्याचं सांगितलं आहे. 'राज्यपातळीवर काही राज्यांमध्ये राज्यपालांकडून थेट कार्यकारी वर्गाला सूचना दिल्या जातात, असं ऐकायला मिळत आहे. राज्यपालांना राज्याच्या बाबतीत सल्लामसलत करण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी जरूर वापरावा. पण मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्र तयार होणार नाहीत, तसंच समन्वयामध्येही चूक होणार नाही, असं मला वाटतं,' असं ट्विट पवारांनी केलं आहे.