प्रफुल्ल पवार / अलिबाग : अनेक लोक कोरोनाच्या धास्तीमुळे आपल्या गावाकडे परत आहेत. मात्र, अनेकांनी परतीचा मार्ग पत्करला तरी कोरोनाचे संकट कायम आहे. आता गावातही कोरोना शिरल्याने गावकरीही सर्तक झाले आहेत. काही ठिकाणी लोकांना गावात प्रवेश दिला जात नसल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे गावी परतणाऱ्यांचे हाल होत आहे. दरम्यान, रायगड जिल्ह्यात एका गावाने नवा आदर्श ठेवला आहे. नाईक कुणेतील ग्रामस्‍थ मुंबईकर आणि चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज आहेत. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये आणि येणाऱ्या गावकऱ्यांना त्रास होऊ नये, म्हणून काळजी घेताना दिसत आहेत. त्यांनी गावाच्या वेशीवर तंबू ठोकून निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. या गावकऱ्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या भीतीने नातीगोती विसरली जात आहेत. शेजारधर्म तुटला जात आहे. बहुतांशी ठिकाणी मुंबई वरुन येणा-या चाकरमान्यांना गावात घेण्यास विरोध केला जात आहे. परंतु हळूहहू ग्रामस्‍थांची मानसिकता बदलते आहे . झी २४ तासने प्रकाशात आणलेला पन्‍हळी पॅटर्नचे अनुकरण सुरु झाले आहे. अलिबाग तालुक्यातील खानाव ग्रामपंचायत अंतर्गत नाईक-कुणे ग्रामस्थांनी मुंबईकर चाकरमान्‍यांच्‍या स्‍वागताची तयारी केली आहे.  ग्रामस्‍थांनी अंगमेहनतीने सर्वसुविधांसह तात्‍पुरते क्‍वारंटाईन सेंटर उभारले आहे.



 खानावच्या सरपंच अनिता गोंधळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गावकऱ्यांसह कोरोनाने भयभीत झालेल्या आपल्या गावातील मुंबईकरांना आधार देण्यासाठी ग्रामस्थांची बैठक घेतली .यात आपल्या गावातील मुंबईत राहणाऱ्या कोरोनाने भयभीत झालेल्या गाववाल्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना धीर देण्याची गरज आहे. त्यांना या भीतीतून बाहेर काढण्यासाठी गावाशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे सर्वांचे एकमत होवून मुंबईकर ग्रामस्थांना गावात प्रवेश देण्यावर सर्व ठाम झाले आणि त्यातून त्यांच्या राहण्यासाठी तंबू ठोकण्याची संकल्पना मांडली गेली.



गावापासून दूर शेतजमिनीत सर्व ग्रामस्थांनी अंगमेहनतीने शेतजमीनीत कापडी मंडप तयार केले आहेत. पाण्यासह न्‍हाणीघर , शौचालयाचीही तात्पुरती व्यवस्था केली आहे.  स्‍वयंपाकासाठी सर्व साहित्‍य उपलब्‍ध करुन दिले आहे . ग्रामस्थांनी या कामामध्ये स्वतःला झोकून देवून काम केले आहे.  या सुविधेमुळे कोरोनाने हवालदिल झालेल्या मुंबई करांना चांगलाच आधार मिळणार  आहे. एकीकडे चाकरमान्यांच्या व्यवस्थेवरुन वाद निर्माण होत असताना अलिबाग तालुक्यातील नाईक कुणे येथील ग्रामस्थांनी कोरोनाग्रस्त ग्रामस्थांसाठी दाखविलेले औदार्य बिथरलेल्या चाकरमान्यांसाठी आशादायी ठरत आहे.