मुंबई : किल्ले रायगडावर ६ जून रोजी होणा-या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची तयारी यंदाच्या वर्षी कशी असेल, अशा प्रश्न समस्त शिवभक्तांना पडला आहे. एकीकडे महाराजांचा  राज्याभिषेक सोहळा तर दुसरीकडे  कोरोनाचा वाढता कहर. त्यामुळे यंदाचा राज्याभिषेक सोहळा कसा पार पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ६ जून रोजी दोशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त कशाचीही पर्वा न करता दरवर्षी रायगडावर पोहोचत असतात. फक्त महाराजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्यांत साठवून घेण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन शिवभक्त गडावर येत असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येमुळे यंदाच्या वर्षी एकही सण साजरा करता आलेला नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन वाढण्याच्या देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा सर्व परिस्थित महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नसल्याचा शद्ब छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सर्व शिवभक्तांना दिला आहे. 


ते म्हणाले, 'सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा माझा मानस आहे.' शिवाय यासंदर्भात त्यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत देखील बोलणं झालं आहे. 


या महिना अखेरपर्यंत परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आणि तो सर्वांना कळवण्यात येईल, असं देखील छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे ते गेल्या काही दिवसांपासून  महाराष्ट्रातील विविध भागांतील शिवप्रेमी, इतिहासकार, शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे सदस्य, अनेक दुर्गप्रेमी संस्थांचे सदस्य, संबंधित विविध संघटना, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पत्रकार या सर्वांशी चर्चा करत आहेत.