Shivrajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळा सुरु असताना नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आले आहे. शिवराज्याभिषेकाला (Shiv Rajyabhishek Coronation Ceremony) उपस्थित असलेले रायगडचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) नाराज असल्याची चर्चा आहे. आयोजनात त्रुटी राहिल्याने खासदार नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्याभिषेकानंतरच्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ फिरवली. सत्कार सोहळा आणि जाहीर कार्यक्रमातून ते बाहेर पडले. त्यांच्यासह आमदार अनिकेत तटकरेही कार्यक्रमातून निघून गेले. हा कार्यक्रम राज्य सरकारने घेतला होता, मात्र कार्यक्रम संपल्यानंतर राजशिष्ठाचाराचे नियम पाळण्यात आले नाहीत, असा आरोप तटकरे यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवराज्याभिषेक सोहळ्यात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची नाराजी दिसून आली. त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावली. मात्र तडकाफडकी तेथून निघाले.  यावेळी आमदार अनिकेत तटकरेंसह सुनील तटकरे कार्यक्रम अर्धवट सोडून निघाले. याबाबत तटकरे म्हणाले, कार्यक्रमात नियोजनाचा अभाव दिसून आला. मी रायगडचा खासदार आहे. देशभरात 542 खासदार आहेत. या खासदारांपैकी मी रायगडचे प्रतिनिधीत्व करतो. याचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराजाची स्थापन करत मानबिंदू महाराष्ट्राचा आणि देशाचा झाला आहे. अशा परिस्थिचा मी प्रतिनिधी आहे. स्वयंमघोषीत नेते स्वत:चे विचार मांडू शकत नाहीत. यावेळी मला वाटले होते की महाराजांना अभिवादन करण्याचे संधी मिळेल. मात्र, कार्यक्रमात बोलू न देणे असे दिसून येत होते. त्यावेळी मला हे राजकीय हेतूने डावल्याचे दिसता क्षणीच मी तेथून निघालो.


आपल्या मतदारसंघाचे नाव रायगड आहे. येथील जनतेने आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहे. रायगडवरच्या कार्यक्रमात अभिवादन करताना बोलू दिले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र स्वयंघोषित स्वागताध्यक्ष यांच्या भाषणानंतर आपले भाषण होऊ दिले नाही. कार्यक्रमाच्या दोन पत्रिका छापल्या गेल्यात. हे सगळं कशासाठी आहे. या सगळ्यात राजशिष्ठाचार पाळला गेला नाही. काहीजण जर सरकारचा कार्यक्रम हायजॅक करुन आपणच तो कार्यक्रम करीत असल्याचं भासवत असतील, तर त्याला इलाज नाही, असा टोला त्यांनी  भरत गोगावले यांना नाव न घेता हाणला. आपण स्वाभिमानी नागरिक म्हणून या कार्यक्रमातून निघून जाणे पसंत केलं. शिवप्रेमी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मी स्वीकारले. पालकमंत्र्यांच्याकडे याबाबत सांगितलं होते. मात्र तेही हतबल असतील, असे तटकरे म्हणाले.


रयतेचा राजा अर्थात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.