मुंबई : कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आज ३२१४ नवीन कोरोनाबाधित रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज १९२५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ६९,६३१ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर राज्यात आज २४८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी ७५ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरीत १७३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर हा ४.६९% एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८,०२,७७५ नमुन्यांपैकी १,३९,०१० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 


सध्या राज्यात ६,०५,१४१ लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर २६,५७२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. सुमारे अडिच महिन्यानंतर धारावीतील कोरोना रूग्णांच्या संख्येत एक अंकी वाढ झाली आहे. आज धारावीत केवळ ५ कोरोना रूग्ण वाढले, तर एकाचा मृत्यू झाला आहे.धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या २१८९ वर पोहचली असून एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या ८१ झाली आहे. दादरमध्ये १३ आणि माहिममध्ये १५ रूग्ण वाढले. 



सध्याच्या घडीला मुंबई उपनगरांतील अनेक वॉर्डांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जुलैच्या मध्यापर्यंत शहरातील कोरोनाची साथ नियंत्रणात येईल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता ३६ दिवसांवर आला असून वरळी, देवनार, गोवंडी, बैंगनवाडी यासारख्या हॉटस्पॉटमधील स्थिती नियंत्रणात आली आहे. खाटा, रुग्णवाहिका, डॉक्टर, उपचार केंद्र या सर्व सुविधांमध्ये कित्येक पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आपण याच वेगाने काम करत राहिलो तर जुलैच्या मध्यापर्यंत मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येईल, असे चहल यांनी सांगितले.