पुणे: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण सर्वात आधी झाली होती. पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे.  ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त या रूग्णावर एका खासगी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पहिले कोरोनाग्रस्त दाम्पत्य अगदी ठणठणीत बरे होऊन घरी गेले. ही समाधानकारक बाब समोर आल्यानंतर आज कोरोनाचा पुण्यात पहिला बळी गेल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यक्तीचा परदेश दौरा झाला होता का? याबाबत अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पुण्यात दुबईहून फिरून आलेल्या दाम्पत्याला पहिली कोरोनाची लागण झाली होती. पिंपरी चिंचवड आणि पुणे असून मिळून आतापर्यंत ४२ कोरोनाबाधित रूग्ण सापडले होते. पिंपरी चिंचवडमध्ये सुरुवातीला कोरोना बाधित झालेल्या तीन रुग्णांना काही दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले. हे तीन ही रुग्ण दुबईवरून आले होते. १४ दिवसानंतर घेतलेल्या दुसऱ्या चाचणीचा अहवाल ही गुरुवारी रात्री उशिरा निगेटिव्ह आल्यानंतर या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले.



यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी टाळ्या वाजवत या रुग्णांना निरोप दिला. पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधित १२ रुग्ण होते, त्यातल्या तीन जणांना आता घरी सोडण्यात आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात शहरात कोरोनाचा एक ही रुग्ण वाढलेला नाही.