बारामतीमध्ये कोरोनाचा दुसरा बळी
आज मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता.
बारामती: बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शनिवारी आणखी एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. बारामती ग्रामीण भागातील हा पहिला बळी गेला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाला किडणीचा विकार होता. डायलिसीस करण्यासाठी हा रुग्ण पुणे शहरातील खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. त्यावेळी, तेथे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला होता. त्याची तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती. माळेगावमध्ये संबंधित परिसर पोलिसांनी सिल केला आहे.
परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात एकूण पाच रुग्ण बरे झाले आहेत. तर आज झालेल्या दुसऱ्या मृत्यूनंतर कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे.
दरम्यान, याआधी एका भाजी विक्रेत्याचा, पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्या पाठोपाठ आज डायलिसीसवर असलेल्या मालेगावच्या रुग्णाचा मृत्यू झाला. आज झालेल्या दुसऱ्या कोरोनाग्रस्ताच्या मृत्यूनंतर प्रशासनाची चिंता वाढली आहे.
बारामतीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनानने लॉकडाऊनची अंमलबजावणी आणखी कठोरपणे केली आहे. बारामतीकरांनी घराबाहेर पडू नये आणि प्रशासकीय यंत्रणेला पूर्णपणे सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा इतिहास लक्षात घेता त्यांना इतरांकडून कोरोनाची बाधा झाल्याचं समोर येत आहे. त्यामुळे कोरोना आणखी पसरु नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.