कोरोना : नागपुरातील उद्याने, बार-हॉटेल्सही ३१ मार्चपर्यंत बंद
नागपूर शहरातील सर्व उद्याने आजपासून बंद करण्यात आली आहेत.
नागपूर : शहरातील सर्व उद्याने आजपासून बंद करण्यात आली आहेत. प्रत्येक घरी जाऊन संशयित रुग्ण तपासण्याची सद्या गरज नाही. मात्र, महापालिकेच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत २५० पेक्षा जास्त कॉल आले आहेत. या लोकांना दररोज दिवसातून दोनदा विचारणा केली जाते. दहा देशातील आलेल्या २७ नागरिकांना कोरेन्टाईन करत आमदार निवास मध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे पत्रकार परिषदेत दिली.
'लग्नात ५० पेक्षा जास्त लोक नकोत'
सर्व मंगल कार्यालयांना सूचना दिल्या आहे. एक तर लग्नाचे बुकिंग रद्द करा किंवा लग्नात फक्त ५० लोकच असावेत, अशी अट घालण्यात आली आहे. लग्नात ५० पेक्षा जास्त लोक असल्यास मंगल कार्यालयाला जबाबदार मानले जाणार आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार, अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.
आतापर्यंत नागपूरात चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कात असलेले ९० रुग्णांची तपासणी केली असून ते निगेटिव्ह आढळले आहेत. ज्यांना होम कोरेन्टाईन केले आहे, त्यांच्याकडे मनपाच्या नियंत्रण कक्षामधून दिवसातून दोन वेळा फोन करुन माहिती घेतली जात आहे, तर आरोग्य पथकातील कर्मचारी एकदा त्यांच्या घरी जाऊन ते घरीच असल्याची खात्री करत आहेत. महापालिकेच्या हेल्पलाईनवर आतापर्यंत २५० पेक्षा जास्त कॉल आले आहेत. १० देशातून भारतात परतलेल्या २७ नागरिकांना सध्या नागपूरच्या आमदार निवासात कोरेन्टाईनही केले आहे.
मध्यरात्रीपासून दारूची दुकानं, रेस्टोरंट, क्लब बंद
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून दारूची दुकानं, रेस्टोरंट, क्लब बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय घेण्यात आला आहे. ३१ मार्चपर्यंत दुकाने बंद राहणार आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याबाबत माहिती दिली.