Coronavirus Updates : मुंबईसह राज्यात कोरोनाचा पुन्हा वेगाने फैलाव, 6988 नागरिक होम क्वारंटाईन
Coronavirus Updates : राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय.
Coronavirus Updates : राज्याची चिंता वाढवणारी बातमी. राज्यात कोरोनाच्या तब्बल 926 रुग्णांची नोंद झाली. तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे. राज्यात गुरुवारी 803 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांचा आकडा 4 हजारांच्यावर पोहोचलाय. दुसरीकडे सरकार कोरोनाला गांभीर्याने घेत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. रुग्णसंख्या वाढतेय मात्र अजूनही सरकारला कोरोनाचं गांभीर्य नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
मुंबईत 5 रुग्णांची स्थिती गंभीर
मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढायला लागलीय. सध्या मुंबईत शहर, उपनगरात 6 हजार 988 नागरिक होम क्वारंटाईन आहेत. याशिवाय शहरात १ हजार 367 सक्रीय रूग्णांपैकी ९२ टक्के रूग्णांना लक्षणं नाहीत. सध्या मुंबईत 5 रुग्णांची स्थिती गंभीर आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्यात शुक्रवारी 926 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तीन रूग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात सध्या 4 हजारांहून अधिक रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
विदर्भात कोरोनाने डोके वर काढले
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल रुडे आणि त्यांची पत्नी दोघेही पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 11 रुग्ण आढळले असून, हे रुग्ण गडचिरोली, चामोर्शी, धानोरा आणि अहेरी तालुक्यातील आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यानंतर आता सांगलीत शासकीय, निमशासकीय कार्यालयं, बँका, शाळा, महाविद्यालयं या ठिकाणी सर्व कर्मचा-यांना मास्क अनिवार्य करण्यात आलाय. कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागलाय. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना मास्क वापरण्यासह सॅनिटायझर आणि सोशल डिन्स्टन्सिंग पाळण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकार अलर्ट मोडवर
देशातल्या कोरोना रुग्णवाढीमुळे केंद्र सरकार सतर्क झालंय. डॉ. मनसूख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली देशातल्या सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत देशातल्या राज्यनिहाय कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच राज्यांना खबरदारीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
देशात एकीकडे कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना केंद्र सरकार अलर्ट मोडवर आले आहे. आरोग्यमंत्र्यांनी राज्यांसाठी निर्देश जारी केलेत. आरोग्यमंत्र्यांनी राज्यांना 8 आणि 9 एप्रिलला कोरोना प्रतिबंधात्मक तयारीचा आढावा घेण्याचे निर्देश जारी केलेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात केरळ, महाराष्ट्र, दिल्लीत सर्वाधिक रूग्ण आहेत. पॉझिटीव्ह सँपल्सचं जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत. कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू आणि हरियाणात पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांहून अधिक आहे.