मुंबई : कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर केलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona Increased Maharashtra) उद्रेक वाढत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात असलेली कोरोनाची परिस्थिती पुन्हा राज्यावर ओढवतेय की काय? अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्यात (Coronavirus increas summer Maharashtra) करोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे. तसेच एका बाधित व्यक्तींमागे ३० जणांचा शोध घेणे आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी २४ तास लसीकरण सुरू करणे, अशा शिफारस कोरोना कृती दलाने राज्य सरकारला केल्या आहेत.


उन्हाळ्यात कोरोना वाढण्यामागचं कारण


अमेरिका, ब्रिटन हे समशीतोष्ण कटिबंधातील देश असून, तेथे थंडीमध्ये करोनाचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढला आणि उन्हाळ्यात मात्र कमी झाला असे दिसून आले. याउलट आपल्याकडे उन्हाळ्यात संसर्गाची तीव्रता अधिक होती आणि थंडीत कमी झाली. आता राज्यातील रुग्णसंख्या वाढत असून, येत्या उन्हाळ्यातही संसर्गाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. आता आपल्याकडे गेल्या वर्षीच्या जुलैसारखी करोनास्थिती आहे. मात्र पुढील काही दिवस काटेकोरपणे नियंत्रण केले नाही तर पुन्हा सप्टेंबर २०२० प्रमाणे परिस्थिती उद्भवू शकेल. 


मुंबई महानगर प्रदेशात चाचण्यांची संख्या वाढविलेली आहे आणि बाधितांचे प्रमाण पाच टक्के आहे. परंतु ठाण्यात काही ठिकाणी संसर्गाचा अधिक प्रसार होत असल्याचे दिसून येते. अन्य राज्यांत काही ठिकाणी बाधितांचे प्रमाण ५ ते १५ टक्कय़ांदरम्यान आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात आधी प्रादुर्भाव कमी होता. अकोला आणि अमरावती या भागांत संसर्ग तीव्रतेने पसरत आहे. वातावरण बदलाचाही एक परिणाम म्हणून रुग्णसंख्या वाढत आहे.


रुग्णसंख्या नियंत्रणासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मुंबईत सध्या दरदिवशी सुमारे २० हजार चाचण्या होत आहेत. तसेच प्रत्येक बाधित व्यक्तीमागे ३० संपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक आहे. संसर्गाचा प्रसार होत असणारे क्षेत्र प्रतिबंधित करायला हवे अशा सूचना कृती दलाने सोमवारी झालेल्या बैठकीत राज्याला दिल्या आहेत. 


संसर्गाची तीव्रता वाढण्याआधी जोखमीच्या वयोगटांतील व्यक्तींचे लसीकरण मोठय़ा प्रमाणात झाल्यास संभाव्य मृतांचे प्रमाण कमी करता येईल. लसीकरणाचा वेग वाढविण्यासह २४ तास लसीकरणाची सुविधा उपलब्ध करावी. तसेच ४५ आणि ६० वर्षांवरील ज्या व्यक्ती लसीकरणासाठी केंद्रापर्यत जाऊ शकत नाहीत, अशांसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी लसीकरणाची सुविधा सुरू करण्याची शिफारसही कृती दलाने राज्याला केली आहे.


राज्यात कोरोनाचे ९९२७ नवे रुग्ण आढळून आलेत. सोमवारी रुग्ण कमी झाले मात्र मंगळवारी पुन्हा वाढल्याचं दिसून आलं आहे. २४ तासांत पुन्हा रुग्णसंख्या १० हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली. गेल्या २४ तासांत ५६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.