मुंबई : कोरोना वॉरियर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाचा बुस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे. मात्र या बुस्टर डोसचं स्वरूप नेमकं कसं असेल? बुस्टर डोस म्हणून नेमकी कोणती लस देणार? याबाबात सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या 10 जानेवारीपासून कोरोना वॉरिअर्स आणि सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस दिला जाणार आहे. मात्र या बुस्टर डोसबाबत काहीसं संभ्रमाचं वातावरण आहे. कारण बुस्टर डोस नेमका कोणत्या स्वरूपात देणार? कोणती लस बुस्टर डोस म्हणून देणार? ते अद्याप स्पष्ट नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय याबाबत लवकरच निश्चित धोरण आखणार असल्याचं समजतं आहे.



बुस्टर डोसबाबात महत्त्वाची माहिती


- एकाच लसीचे दोन डोस ओमायक्रॉनपुढं कुचकामी ठरत आहेत.
- तर दोन वेगवेगळ्या लसींचे डोस परिणामकारक ठरत असल्याचं अभ्यासानंतर समोर आलं आहे
- त्यामुळं कॉकटेल स्वरूपात बुस्टर डोस देण्याची तयारी सरकारनं चालवल्याचं समजतं.
- याचाच अर्थ ज्यांनी कोव्हॅक्सिनचे डोस घेतलेत, त्यांना कोविशिल्डचा बुस्टर डोस दिला जाईल.
- ज्यांनी कोव्हिशिल्डचे डोस घेतलेत, त्यांना कोव्हॅक्सिनचा बुस्टर डोस दिला जाईल.
- त्याशिवाय सीरम इन्स्टिट्यूटनं बनवलेली 'कोवोव्हॅक्स' ही कॉकटेल लस बुस्टर डोस म्हणून दिली जाण्याची शक्यता आहे.


लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर किती काळानं बुस्टर डोस घ्यावा, याबाबत देखील केंद्र सरकारच्या पातळीवर विचारविनिमय सुरू आहे. लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे 9 ते 12 महिन्यांनी बुस्टर डोस दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं बुस्टर डोसबाबत सरकार नेमकं काय धोरण आखत आहे, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.