पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण
पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मुंबई : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील पाच संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. आता राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्यावी. वारंवार साबणाने हात धुवावेत, हस्तांदोलन करु नका आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. वायसीएममध्ये विलगीकरण कक्ष उभारण्यात आला असून तो सज्ज केला आहे. तर सात खासगी रुग्णालयात ४८ आयसोलेशन बेड उपलब्ध केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका सक्षमपणे तयार असून, नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे.
वायसीएममध्ये दाखल केल्या गेलेल्या पाच जणांच्या घशातील द्रवाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी तीन जणांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. पुण्यातून दुबईला जे प्रवाशी गेले होते. त्यापैकी हे प्रवासी आहेत. दुबईतून परत आल्यानंतर विमानतळावरुन टॅक्सीने थेट हे प्रवासी घरी परतले होते. दरम्यान, ज्या टॅक्सीतून हे परतले त्या टॅक्सी चालकालाही कोरोनाची बाधा झाली आहे. तो मुंबईचा आहे. मुंबईतही आज आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या १५वर पोहोचली आहे. पहिले दोन कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळले. त्यानंतर पुण्यात रुग्ण संख्या नऊवर पोहोचली. यात पिंपरी-चिंचवडमध्ये तीन रुग्ण आहेत. मुंबईत चार, ठाण्यात एक आणि पुण्यात नऊ असे एकूण १५ रुग्ण राज्यात झाले आहेत.