CoronaVirus : गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकार कठोर निर्बंध करणार का?
राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
मुंबई : गर्दी नियंत्रणासाठी राज्य सरकार कठोर निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. राज्यात एकीकडे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे नियम न पाळता अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं दिसून येतं आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत रूग्णसंख्येचा आढावा घेऊन त्या दृष्टीने पावलं उचलण्याचा निर्णय रविवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. कठोर पावले उचलण्यावर मंत्रिमंडळात चर्चा झाली. राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू करणे योग्य होणार नाही; परंतु गर्दी रोखण्यासाठी काही तरी कठोर उपाय योजण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली.
केंद्रीय पथकानं काय नोंदवली निरीक्षणं?
नियमांकडे दुर्लक्ष आणि बेफिकिरीमुळे महाराष्ट्रात कोरोना बळावत असल्याचं निरिक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. . नागरिकांच्या निष्काळजीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोना नियमांना कंटाळून नागरिक आता सार्वजनिक ठिकाणी बेफिकीरपणे वावरू लागले आहेत. त्यांना कोरोना संसर्गाची भीती राहिली नाही असं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. राज्य सरकारने निर्बंध शिथील करू नये असा सल्लाही देण्यात आलाय. केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ञांच्या पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. त्यात हे निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
राज्यात कोरोनाचा आकडा वाढतोय
राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 11 हजारांची रुग्णवाढ झाली आहे. मुंबई, नागपूरची धोकादायक स्थिती कायम आहे. औरंगाबादेत 11 मार्च ते 4 एप्रिल अंशत: लॉकडाऊन करण्यात आले आहे.
औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशत: लॉकडाऊन
औरंगाबादेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंशत: लॉकडाऊन करण्यात येणार आहे. धार्मिक सभा, सांस्कृतीक कार्यक्रम, आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये पूर्ण लॉक डाउन नाही, अंशतः लॉक डाउन करण्यात येणार आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे अंशत: लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्चपासून मध्यरात्री ते 4 एप्रिलपर्यंत लग्नसमारंभावर पूर्ण बंदी आणण्यात आली आहे.