सांगली : कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग पाहता आजपासून पाच दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आज सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्यांवर सांगली शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. (Coronavirus : Strict restrictions in Sangli )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली जिल्ह्यात मॉर्निंग वॉकवर सुद्धा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र आज काही युवक मॉर्निंगला बाहेर पडल्याने अशा युवकांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना अर्धातास बसवून ठेवलं. त्यांना सक्त ताकीद देत सोडून देण्यात आले. यापुढे रस्त्यावर दिसल्यास कडक कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बुधवार 14 पासून 19 जुलैपर्यंत जिल्ह्यातील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. रस्त्यावरील खाद्यपदार्थास तसेच मॉर्निंग वॉकसाठी बंदी घालण्यात आली आहे. तर किराणा दुकानांना घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.


जुलैमधील दुसर्‍या आठवड्याचा साप्‍ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 च्या दरम्यान आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध 19 पर्यंत वाढविण्यात आले होते. परंतु, रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत असल्याने या निर्बंधामध्ये आणखी वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ते लागू करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली.


 रस्त्यावरील कोणत्याही प्रकारचे साहित्य आणि खाद्यपदार्थ विक्रीला पूर्णपणे बंदी घालण्यात येत आहे. तसेच खुली मैदाने, मॉर्निंग वॉक, सायकलिंग यासाठी देखील बंदी घालण्यात आल्याचे जिल्ह्याधिकारी म्हणाले.