प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. याकाळात नागरिकांना अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागत आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या जवळच्यांच्या गाठीभेटी दुरावल्या आहेत. अशात आपल्या जोडीदाराचं अंतिम दर्शन व्हिडिओ कॉलद्वारे घेण्याची वेळ एका पत्नीवर आली. ही अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना दोडामार्गातील मोर्ले या गावात घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे हा विषाणू जेवढा विषारी आहे. तेवढाच हा काळ देखील क्रूर असल्याचे या घटनेवरून लक्षात येते.


 ६५ वर्षीय चंद्रकांत बांदेकर यांचे मुंबईतील अंधेरी येते राहत्या घरी अकस्मात निधन झाले. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांचे पार्थिव गावी घेऊन जाणे शक्य नव्हते. तर गावी असलेल्या पत्नीला मुंबईत आणणे कठीण होते. 


चंद्रकांत बांदेकर हे शिमगोत्सवापूर्वी गावी गेले होते. रामनवमी उत्सवासाठी पुन्हा गावी यायचे होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्यांना गावी जाता आलं नाही. यामुळे चंद्रकांत बांदेकर मुंबईत आणि त्यांची पत्नी गावी राहिली. या दरम्यान त्यांचा मोबाइल आणि व्हिडिओ कॉलद्वारे संवाद सुरू होता. 



गुरूवारी अल्पशा आजाराने अंधेरीत त्यांच राहत्या घरी निधन झालं. अवघड परिस्थितीत घडेलल्या या घटनेमुळे काय निर्णय घ्यावा हे कुणालाच कळत नव्हतं. अशावेळी त्यांच्या पत्नीला अखेरचं दर्शन व्हावं म्हणून स्मार्टफोनद्वारे व्हिडिओ कॉल करण्यात आला. 


अखेर नातेवाईकांच्या सहमतीने पत्नीला आपल्या पतीचं अंतिम दर्शन हे व्हिडिओ कॉलिंगद्वारे घ्यावे लागले. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे मोर्ले गावात हळहळ व्यक्त होत आहे.