अमरावतीनंतर आणखी एका जिल्ह्यात 7 दिवस पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
हिंगोली: राज्यात कोरोनाचं पुन्हा एकदा थैमान सुरू झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. वर्ध्यामध्ये 36 तासांसाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर अमरावतीमध्ये 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांनंतर आता आणखीन एका जिल्ह्यात आठवड्याभराचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे,मंगल कार्यालय,महाविद्यालय ही बंद राहणार आहेत. जिल्ह्यात यापूर्वी रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची संचारबंदीबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्य़ानं वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये बँका, शासकीय कार्यालये, वृत्तपत्रे, दूध मेडिकल यांना मात्र सूट देण्यात आली आहे.
दुसरीकडे अमरावती शहर, अचलपूरमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन आता 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र असं असतानाही अनेकांकडून नियमांचं उल्लंघन करण्यात येत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अंजनगाव सुर्जी शहरात कंटेमेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे. आणखीन कडक निर्णय या 8 दिवसांची परिस्थिती पाहून घेणार असल्याचं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश दिले आहेत.