श्रीकांत राऊत, यवतमाळ :  विदर्भ आणि मराठवाड्यातील लाखो हेक्टर कपाशीवर बोंड अळीचा प्रादूर्भाव, कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला, सरकारला जाग कधी येणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. 


नुकसानीचे पंचनामे नाहीत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंड अळीमुळं देशोधडीला लागण्याची शक्यता आहे. बोंड अळीमुळं लाखो हेक्टर कपाशीचं  नुकसान झालं असून अद्यापही नुकसानीचे पंचनामे करण्यात आले नाहीत. 


कपाशीचं पीक गुलाबी बोंड अळीनं केलं नष्ट 


 बोंड अळीमुळं  यवतमाळ जिल्ह्यातील कपाशीचं पीक उध्वस्त झालंय. जिल्ह्याती शेकडो एकर शेती कपाशीचं पीक गुलाबी बोंड अळीनं नष्ट केलंय. त्यामुळं इथला शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे.


गेल्या वर्षी तुरीचे भाव गडगडल्याने यंदा यवतमाळ जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची  लागवड केली होती.मात्र यंदा कपाशीवर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचं चित्र आहे.या प्रकरणी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी  कृषी विभागाला शेतक-यांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते मात्र त्यावर अद्यापही अंमलबजावनी झाली नाही.


 ४० लाख हेक्टरवर बोंडअळीचा प्रादूर्भाव  


बोंड अळी रोखण्यासाठी जिल्ह्यातील शेतक-यांनी 2004मध्ये बीटी कपाशीचा स्वीकार केला.  सुरुवातीला त्याचा चांगला परिणाम दिसला. कापसाचे उत्पन्न वाढले. मात्र गेल्या वर्षीपासून या बीटी बीजी टू बियाण्यांवरही अळीचा प्रादुर्भाव होवू लागला आहे.यंदा परिस्थिती आणखीच गंभीर बनली आहे.


वारंवार निवेदन देऊनही प्रशासन नुकसानीची दखल घेत नसल्यामुळं संतापलेल्या शेतक-यांनी सरकारी  सर्व्हेक्षणाची वाट न पाहाता उभ्या पिकात नांगर फिरवला आहे. यवतमाळसह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात यंदा एकूण ४८ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.


त्यापैकी ४० लाख हेक्टरवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे. बोंड अळीमुळं कापूस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला असून  राज्य सरकारला कधी जाग येणार हाच खरा प्रश्न आहे.