आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : आयुष्यातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणीदेखील समाजभान जपणारे काही मोजकेच. चंद्रपूरच्या अलमस्त आणि गिरडकर कुटुंबीयांनी आज अशीच आस्था दाखविली. आपल्या मुलांच्या लग्नात त्यांनी चक्क रक्तदान शिबीर राबविले. विशेष म्हणजे नवरदेवही यात रक्तदाते झाले आणि 'आधी केले मग सांगितले' या उक्तीचा प्रत्यय दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही चंद्रपूरकर जोडी शहरातील बल्लारपूर वळण मार्गावरील उत्सव सभागृहात विवाहबंधनात अडकली. हा सोहळा खास ठरला तो या लग्नमंडपात मुद्दाम आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरामुळे. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सर्वोच्च आनंदाच्या क्षणी आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव असणे आणि काही ठोस कृती प्रत्यक्षात आणणे हे दिव्यच. मात्र चंद्रपूरच्या अलमस्त आणि गिरडकर कुटुंबाने नवविवाहीत जोडप्याच्या सूचनेला स्वीकारले आणि विवाहसोहळ्याला समाजभानतेची झालर मिळाली. 


शहरातील निस्वार्थ सेवा फाउंडेशन संस्थेने यासाठी जय्यत तयारी केली. एकीकडे मंगलाष्टके सुरु असताना दुसरीकडे रक्तदानाचे पुण्यकर्म केले जात होते. कार्यकर्त्यांनी या लग्नसोहळ्यात तब्बल २२ रक्तबाटल्या एकत्र केल्या आणि बहुमोल अशी रक्तदानाविषयक जनजागृती केली. 



मी, माझा आणि माझे यापुरते जग असणारे आणि भासविणारे पावलोपावली गवसतात. मात्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समाजऋण फेडण्यासाठी तत्पर असणारे समाजाचा गाडा सकारात्मकरित्या पुढे नेत असतात. वेदानंद आणि नेहाने ठरवून घडवून आणलेला हा उपक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे.