जालना : जालन्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. जालन्यातल्या गोंदेगाव शिवारात प्रेमीयुगुलाला टोळक्याकडून बेदम मारहाण झाली. टोळक्याकडून प्रेमीयुगुलाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होतो आहे. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. व्हिडिओमधील मुलीचा विनयभंग झाल्याचं व्हिडिओतून दिसून येतंय. याप्रकरणी उपविभागीय पोलिसांनी तपास सुरू केला असून एकाला ताब्यात घेतल्याची देखील माहिती मिळत आहे. हे प्रेमीयुगुल बुलढाण्यातील असल्याची माहिती आहे. ते जालन्यामध्ये गोंदेगाव शिवारात आले असताना इथल्या स्थानिकांनी त्यांना मारहाण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागरिकांनी कायदा हातात घेणं अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी दिलीय. तर प्रेमी युगुलाला मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करणं हे कृत्य समर्थनीय नसून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. 


जालना जिल्ह्यात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार गेल्या २ महिन्यांपासून वाढू लागल्या आहेत. पोलिसांचा कुठलाही जरब राहिला नसल्याची टीका भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलीय. तर जालना जिल्ह्यातली प्रेमीयुगुलाला मारहाणीची घटना निंदनीय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 


दरम्यान या घटनेतील आरोपींवर लवकरात लवकर कडक कारवाई होणार असल्याचं अनिल देशमुख यांनी ट्टिवटरद्वारे स्पष्ट केलंय. तर समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंनी या घटनेचा निषेध केला आहे.