Covid-19 : गटाराच्या पाण्यात जे सापडले ते पाहून शास्त्रज्ञही हैराण...
राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र, एक धक्कादायक बाब पुढे आली आहे.
किरण ताजणे / पुणे : राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत आहे. मात्र, एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. आता सांडपाण्यात कोरोनाचे 4 व्हेरियंटस सापडल्याने संशोधकही चकीत झाले आहेत. ( Scientists are shocked) त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर किंवा घराजवळ कुठे सांडपाणी दिसले तर जरा जपून. त्यापासून थोडे लांबच राहा. कारण पुण्यातल्या गटाराच्या पाण्यात जे सापडलं ते पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. सांडपाण्यातून कोरोना तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो का? याबाबत हा रिपोर्ट.
या अशा सांडपाण्यापासून जरा दोन हात लांबच राहा. कारण महाराष्ट्रात सांडपाण्यात कोरोनाचे चक्क चार व्हेरियंट सापडलेत. पुणे आणि गाझियाबादमधल्या संशोधन संस्थांनी पुण्यातल्या गटारांमधल्या सांडपाण्याचा अभ्यास केला. त्यात हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. (Covid-19: 4 variants of corona found in sewage at Pune)
सांडपाण्यात कोरोनाचे नवे व्हेरियंट
एस : एन 801, एस : सी 80 आर, एनएसपी 14 : सी 279 एफ आणि एनएसपी 3: एल 550 डेल अशी या व्हेरियंटची नावे आहेत. पुण्यातल्या गटारांमध्ये संसर्गाचे 108 म्युटेशन आढळले आहेत. याआधी मुंबई, हैदराबाद, बनारसमधल्या नाल्यांमध्ये कोरोना व्हेरियंट सापडले होते. धक्कादायक म्हणजे देशात कुठल्याही रुग्णाला या चार व्हेरियंटचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे पुण्यातल्या गटारांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना आला कुठून, याचा शोध घ्यावा लागणार आहे.
पुण्यातल्या गटारांमध्ये दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि अमेरिकेत आढळून आलेले कोरोनाचे व्हेरिएंटही सापडलेत. देशात एकाही रुग्णाला याची बाधा न होता एवढे व्हेरियंट सांडपाण्यात कसे काय सापडले, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. आता सांडपाण्यापासून नव्या कोरोनाचा धोका आहे का, याचा अभ्यास सुरू झाला आहे. दरम्यान, पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आता यात काही पुढे येते, याची उत्सुकता आहे.