वाढत्या कोरोनामुळे पुण्यातही निर्बंध कडक, 14 मार्चपर्यंत शाळा बंद
पुण्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा- महाविद्यालयं बंद राहणार आहेत.
पुणे: राज्यात कोरोनाचं थैमान पुन्हा एकदा सुरू झालं आहे. ग्रामीण भागातून कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती शहर, अचलपूर इथे 8 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर यवतमाळमध्ये 48 तास संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यासोबत आता पुण्यातही काही नियम कडक केले आहेत.
पुण्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा- महाविद्यालयं बंद राहणार आहेत. 14 मार्चपर्यंत शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यामध्ये कोरोना पर्शवभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध पुढील 2 आठवडे कायम राहणार आहेत. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी कायम राहणार आहे. याशिवाय खासगी क्लासेस देखील बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हॉटेल रेस्टोरंट्स 11 वाजता बंद करावे लागणार आहेत.
राज्यात कुठे आणि कसे निर्बंध
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं हिंगोली जिल्ह्यात येत्या 1 मार्च ते 7 मार्च पर्यंत सकाळी 7 ते रात्री बारा वाजेपर्यंत कडक संचारबंदी लावण्यात आली आहे.
धार्मिक प्रार्थनास्थळं, महाविद्यालयं,मंगल कार्यालयं,पेट्रोल पंप,दुकानं,हॉटेल्स बंद ठेवावी लागणार आहेत. त्यामुळे, नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आदेश देण्यात आले आहेत.
सातारा जिल्ह्यात आज 117 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबधितांचा आकडा 58 हजार 803 वर गेला आहे. साताऱ्यात अद्यापही 1 हजार 253 जणांवर उपचार सुरु असून गेल्या २४ तासात एका रुग्णाचा मृत्यू ही झाला आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना संसर्गजन्य आजारानं डोकं वर काढलं असून, तब्बल एक हजारांवर रुग्ण आढळून आलेत.
कोरोनाला आळा घालण्यासाठी 21 फेब्रुवारी पासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व दुकाने आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. तर सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.