मुंबई / नाशिक : नाशिक शहर आणि परिसरात कोविड-१९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नाशिक शहरातील ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या सहकार्याने ५०० बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि  जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रेडाईच्या पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची बैठक बोलावली होती. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रेडाईचे अध्यक्ष रवी महाजन, उपाध्यक्ष कुणाल पाटील, सहसचिव अनिल आहेर, सचिन बागड, सदस्य अतुल शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


या बैठकीत ठक्कर डोम येथे क्रेडाईच्या माध्यमातून ५०० खाटांचे कोविड केअर सेंटरसाठी बेडसह सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी केली. त्यानंतर क्रेडाईच्यावतीने या कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले. तसेच या कोविड केअर सेंटर मध्ये महापालिकेच्यावतीने आवश्यक सर्व स्टाफ आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येऊन महापालिका अधिकारी यावर नियंत्रण ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.



क्रेडाईच्या माध्यमातून कोविडच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका रुग्णालयात पाच डिजिटल एक्सरे मशीन, पाच इसिजी मशीन, १०० ऑक्सिमिटर, ५० थर्मल स्कॅनर,हेल्थ केअर यॅप, नाशिक जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १ हजार पीपीई किट, मास्क, नाशिक ग्रामीण पोलिसांना १००० पीपीई किट, मास्क , सॅनिटायझर, नाशिक शहर पोलिसांना ३५०० च्यवनप्राश बॉटल यासह पाच हजार गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य तसेच शासकीय निमशासकीय कार्यालयात १०० सॅनिटायझर स्टँड, १० सॅनिटायझर बूथ यासह विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आता ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर तयार करून देण्यात येत आहे, असे क्रेडाई अध्यक्ष रवी महाजन यांनी यावेळी सांगितले.