Covid-19 : रक्ताच्या नात्यांनी झिडकारले मात्र सरकारी कर्मचारी-पोलीस, पत्रकार मदतीला
आजकाल कोरोनाचा ( Coronavirus) लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी रक्ताच्या नात्याची माणसंही दूर पळतात. कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.
प्रफुल्ल पवार / अलिबाग : आजकाल कोरोनाचा ( Coronavirus) लोकांनी इतका धसका घेतलाय की एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी रक्ताच्या नात्याची माणसंही दूर पळतात . असाच अनुभव म्हसळा तालुक्यातील केलटे गावात आला. कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार ( Funeral ) करण्यास घरच्यांनी नकार दिला अखेर पोलीस , महसूल कर्मचारी आणि पत्रकार धावून आले आणि त्यांनीच अंत्यसंस्कार पार पाडले आणि कोरोनासारख्या महाभयंकर महामारीतही माणुसकीचे दर्शन घडवले.
महसळा तालुक्यातील दुर्गम डोगराळ भागात असलेल्या केलटे गावातील एका 76 वर्षीय वृदधाचा 30 मे रोजी रात्रीच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला. परंतु घरच्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास आणि अंतिम संस्कार करण्यास नकार दिला . त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या जीवघेण्या आजारातून बाहेर आला होता तोदेखील वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुढे आला नाही किंवा कुणी ग्रामस्थांनीदेखील याकामी पुढाकार घेतला नाही.
प्रसंग मोठा बाका होता . ग्रामीण भागात कोरोनाविषयी प्रचंड भीती आणि गैरसमजाचे वातावरण आहे . अशावेळी मृतदेहावर अंतिम संस्कार कुणी करायचे हा मोठा प्रश्नच होता. गावातील कुणीही पुढे येईना. मग ग्रामस्थांनी म्हसळयाचे मंडल अधिकारी दत्ता कर्चे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. कर्चे यांनी तत्काळ प्रांताधिकारी अमित शेडगे यांना फोन करुन याची माहिती दिली. यानंतर तहसीलदार शरद गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कर्चे यांनी तातडीने पत्रकार निकेश कोकचा व पोलीस हवालदार संतोष जाधव,पोलीस नाईक सूर्यकांत जाधव, 108 रूग्णवाहिकेचा पायलट शरद नांदगावकर आणि भरत चव्हाण यांना बोलावून घेतले. या सर्वांना विश्वासात घेवून याबाबतची माहिती दिली. ही सर्व मंडळी गावात पोहोचली आणि तातडीने कामाला लागली.
कोणतीही भीती न बाळगता अंगावर पीपीई कीट चढवले आणि मग तिरडी बांधायला सुरूवात केली. स्मशानभूमी गावापासून दूर 2 किलोमीटर अंतरावर . या मोजक्याच मंडळीनी तिरडीला खांदा देवून अंतिम संस्कार पूर्ण केले. त्यांच्या या धाडसाचे आणि दाखवलेल्या माणूसकीचे परीसरात कौतुक होत आहे. आज कोरोनाच्या प्रादुर्भावात आपल्याला वेगवेगळे अनुभव येत आहेत. कोरोनाने लोकांना बरंच काही शिकवलं . धर्म, जात पातीच्या भींती कोसळून पडल्या. सर्व भेद विसरून लोक प्रत्येकाला जमेल तशी मदत करीत आहेत. म्हसळयातील केलटे गावातील हा माणूसकीचा धर्म सांगणारा प्रसंग बरंच काही शिकवून गेला एवढं मात्र नक्की.