कोविड नियम धाब्यावर : परवानगी नसताना हातगाडे रस्त्यावर, पालिकेची कारवाई
लातूर जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे.
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. तसेच राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कोविडचे नियमही कडक करण्यात आले आहेत. सकाळी 7 ते 11 या दरम्यान दुकाने उघडी किंवा व्यवसाय करण्यास परवागनगी आहे. मात्र, जिल्ह्यातही कोविडचे नियम लागू करण्यात आले आहे. गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे. परवानगी नसतानाही लातूर शहरात हातगाडा घेऊन भाजीपाला विकणाऱ्यावर लातूर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली.
गंजगोलाई इथे भाजीपाला विक्री करून कोरोना काळात गर्दी जमविल्याप्रकरणी हातगाडे जप्तीची कारवाई महापालिकेच्या पथकाने केली आहे. 8 ते 9 हातगाडे आणि त्यांची भाजी महापालिका आणि पोलिसांच्या पथकाने जप्त केली आहे. तर रस्त्याच्या कडेला भाजी विकणाऱ्या 7 ते 9 जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय सुभाष चौक परिसरात काही फुल विक्रेते हे ही परवानगी नसताना फुल विक्री करीत होते. मात्र पोलीस गाडी पाहून फुल सोडून या सर्वानी पळ काढला. दरम्यान लातूर शहरातील दोन कापड दुकानांनाही मनपाच्या पथकाने प्रत्येकी 10-10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्यात कापड मार्केटमधील ए.एस. गारमेंट आणि हरी विठ्ठल कापड दुकानांचा समावेश आहे. ज्यांना परवानगी नाही अशांनी विनाकारण गर्दी जमवू नये, असे आवाहनही महापालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे.