मुंबई महानगरपालिकेचा अनोखा प्रयोग, पर्यटन स्थळावर मिळणार लस
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई महानगरातील आठ पर्यटन स्थळांवर कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबई महानगरातील आठ पर्यटन स्थळांवर कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. मुंबई हे पर्यटनाच्या दृष्टीने नेहमीच गजबजले शहर आहे. सध्या कोरोनाच्या नियमात शिथिलतेनंतर मुंबईकडे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. हीच बाब लक्षात घेत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सगळ्या उपाययोजना करत असताना लसीकरणाची केंद्र पर्यटन स्थळावर सुरु करण्याचा महापालिकेने अनोखा प्रयोग केला आहे. यामध्ये मुंबईतील आठ पर्यटन स्थळे सुरुवातीला निवडण्यात आली आहेत.
दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात गेट वे ऑफ इंडिया, काळाघोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय, अंधेरीतील महाकाली गुंफा, आरे वसाहतीतील छोटा काश्मिर बोटींग क्लब, कुर्ला येथे स्नो वर्ल्ड फिनीक्स सीटी आणि घाटकोपर मध्ये किडझानीया आरसीटी मॉल अशा आठ ठिकाणी ही लसीकरण केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील किंवा मुंबईबाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
या लसीकरणात कोविशील्ड कोवॅक्सीन या दोन्ही लसीच्या डोस उपलब्ध असतील. १८ वर्षावरील पात्र नागरिकांसाठी पहिला डोस / दुसरी डोस, आरोग्य कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी तसेच ६० वर्षे वयावरील नागरिक यांच्यासाठी प्रतिबंधात्मक लस म्हणजेच बूस्टर डोस सुद्धा देण्याची सुविधा करण्यात आली आहे.
तसेच, १२ ते १५ वर्ष वयोगटातील पात्र मुलांकरीता कोरबेवॅक्स या लसीची पहिला डोस आणि दुसरा डोसची सुविधा करण्यात आली आहे. या आठही ठिकाणी सर्व लसी स्थळ नोंदणी अर्थात ऑन द स्पाट रजिस्ट्रेशनद्वारे देण्यात येतील. या महत्त्वाच्या पर्यटनस्थळांवर लसीकरण सुरू केल्याने लसीकरणाचा वेग आणखी वाढेल, विशेषत: लहान मुलांचे लसीकरण अधिकाधिक संख्येने होईल, अशी महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाला विश्वास आहे.