कल्याण : वाहतुकीसाठी धोकादायक जाहीर करण्यात आलेला कल्याणमधील पत्री पूल रविवारी पाडण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केलंय. त्यासाठी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत जम्बोब्लॉक घेतला जाणार असल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. या कालावधीत कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्जतसाठी सीएसएमटीहून शेवटची डाऊन जलद लोकल स. ८.१६ वाजता, टिटवाळ्यासाठी दादर स्थानकातून शेवटची लोकल स. ८.०७ वाजता आणि कल्याणहून सीएसएमटीसाठी जलद लोकल स. ९.०९ वा. आणि अप धिमी लोकल स. ९.१३ वाजता सुटेल. कल्याणपुढील प्रवाशांच्या सुविधेसाठी कल्याण ते कर्जत-कसारा आणि सीएसएमटी ते डोंबिवलीपर्यंत विशेष लोकल तसेच एसटी सेवा चालविण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे मेल, एक्स्प्रेस सेवेवर परिणाम होणार आहे. 


कल्याणमधील प्रसिद्ध दुर्गाडी किल्ला तसंच कल्याण पूर्ण आणि कल्याण पश्चिम भागाला जोडणाऱ्या पत्री पूलाचं बांधकाम ब्रिटिश काळात झालं होतं. सध्या या पूल कोसळण्याच्या अवस्थेत आलाय. त्यामुळे रेल्वेनं ट्राफिक पोलीस, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचं सांगितलं होतं. 


या गाड्या होणार रद्द...


- मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस 


- मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस 


- मुंबई-भुसावळ पॅसेंजर 


- मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस 


- पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस 


- पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 


- जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस 


पश्चिम रेल्वेचाही जम्बोब्लॉक


पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी देखभाल आणि दुरुस्तीकरीता जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन जलद मार्गावरील वाहतुक अप-डाउन धिम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. दरम्यान काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.