सासुरवाडीतून मुलाला घेऊन जाण्यासाठी आला, सासऱ्याने जावयाला टेम्पोखाली चिरडलं
आपल्या मुलाला नेण्यासाठी सासुरवाडीला आला, पण जावयासोबत घात झाला
लैलेश बारगजे, झी मीडिया, अहमदनगर : सासुरवाडीत जाऊन माझ्या मुलाला घेऊन जातो म्हणणाऱ्या जावयाला सासऱ्याने मारहाण करत टेम्पो खाली चिरडून ठार केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील कौडाणे घडली आहे. दत्तात्रय जानू मुळे असे मृत जावयाचे नाव आहे. या प्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात 7 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
कौडाणे गावात महादेव बाळासाहेब सुद्रिक यांच्या वर्षश्राद्धासाठी रवींद्र सदाशिव मुद्रिक बाबासाहेब दत्तात्रय सुद्रिक, नरेंद्र सदाशिव सुद्रिक, विठ्ठल सदाशिव सुद्रिक, अमोल बाबासाहेब सुद्रिक, सदाशिव दत्तात्रय सुद्रिक (सर्व रा. मुळेवाडी, ता. कर्जत) हे टेम्पो घेऊन आले होते.
दुपारी एकच्या सुमारास जावई दत्तात्रय मुळे यांची सासरवाडीतील मंडळीशी मुलाला घरी घेऊन जाण्यावरून वादावादी सुरू झाली. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झालं. संतापलेल्या सासरा बाबासाहेब सुद्रीक याने टेम्पो चालक विनोद प्रशांत गोल्हार याला टेम्पो जावयाच्या अंगावर घालण्यास सांगितलं.
टेम्पो चालकानेही कोणताही विचार न करता दत्तात्रय मुळे यांच्या अंगावर टेम्पो घालता. यात दत्तात्रय यांच्य डोक्याला आणि छातील गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश गावित यांनी घटनास्थळी भेट दिली आणि 2 जणांना ताब्यात घेतलं.