प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीच्या (Online Fraud) घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकरीच्या आमिषाने देखील अनेकांनीच फसवणूक करण्यात येत असते. अशातच भंडारा (Bhandara Crime) येथील एरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनींची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी (Bhandara Police) याप्रकरणी एका आरोपीला अटक केली असून फसवणूक झालेल्या अन्य लोकांनाही तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपीने फसवणूक झालेल्या विद्यार्थिनींशी रिद्धी पाटील नावाच्या बोगस फेसबुक आयडीवरून संपर्क साधला होता. तसेच आरोपीने या विद्यार्थिनींची ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी त्यांना बनावट ई-मेल आयडीवरून परीक्षेची नोटीस, प्रश्नपत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिकाही पाठवली होती. एवढेच नाही तर, त्यांची परीक्षाही घेतली होती. त्यानंतर आरोपीने डीआरडीओमध्ये निवड झाल्याचे सांगून आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये गुगल पेच्या माध्यमातून 1 लाख 74 हजार 480 रुपये वळते करण्यास सांगण्यात आले होते.


पैसे पाठवल्यानंतर पीडित तरुणींनी नियुक्तिपत्रासाठी त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र आरोपी सतत टाळाटाळ करत राहिला. यामुळे विद्यार्थिनींना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. पीडित मुलींनी तुमसर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने तुमसर पोलिसांनी शोध घेतला असता आरोपी पुरुष असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. या आरोपीने आणखी काहींना फसवले असण्याची शक्यता असल्याने अशा लोकांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


पोलिसांनी काय सांगितले?


"6 जून रोजी तुमसर येथे एका फिर्यादीने तक्रार दिली होती. फेसबुकवरुन नोकरी शोधत असताना एक लिंक मिळाली होती. त्यावर क्लिक केले असता ती डीआरडीओची होती. डीआरडीओमध्ये नोकरी असल्याच्या संदर्भात त्यात जाहिरात होती. फिर्यादिने लिंक उघडल्यानंतर वेळोवेळी त्याला नोटिफिकेशन येत गेले. त्या नोटिफिकेशनमध्ये तिची परीक्षा असल्याचे सांगण्यात आले होते. तिच्या काही मैत्रिणींसुद्धा ही लिंक उघडून पाहिल्यावर त्यांनाही परीक्षेची माहिती देण्यात आली. पण परीक्षा दिल्यानंतर त्यांना तीन चार महिने त्यांना नोकरीसाठी बोलवण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. तपास करत असताना साकोली येथील एका इसमाने ही जाहिरात देऊन आणि भूलथापा देऊन फिर्यांदीकडून रक्कम उकळली होती. आरोपीने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे त्यामुळे लोकांनी स्वतःहून पुढे यावं," अशी विनंती तुमसरचे पोलीस निरीक्षक महादेव ब्रम्हणे यांनी दिली.