भर उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण, बीड जिल्ह्यात पाण्याची गंभीर स्थिती
पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : बीड जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये वाड्यातांड्यावर पाण्याचा गंभीर बनला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिंचोली इथं पाणी टंचाई भासत असून नागरिकांना घोट भर पाण्यासाठी तासोन तास रखरखत्या उन्हात पाण्यासाठी पहारा करावा लागत आहे. या गावातील महिलांना पाण्यासाठी एका हॅन्ड पंप वर अवलंबून राहावे लागत आहे.
गावात आलेली विहीर ही आटली आहे परिणामी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दरवर्षी जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी नियोजन केलं जातं मात्र या वर्षी प्रशासनाने पाण्याचा नियोजनाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत
गावात पाण्याची मोठी टंचाई आहे गावात पाण्याचा एकमेव स्रोत हॅन्डपंप आहे, हा हॅन्ड पंप 24 तास सुरू असतो. तासंतास थांबून एक ते दोन हंडे पाणी मिळतं. या पाण्यामुळे ही अनेक जण आजारी पडतात पर्याय नसल्यामुळे हेच पाणी आम्हाला वापरावे लागते त्यामुळे पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गावकरी करतायत.
बीड जिल्ह्याची ओळख कायम दुष्काळग्रस्त अशीच आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला, त्यानंतर पाण्याचे नियोजन होईल आणि पाणी मिळेल अशी अपेक्षा सर्व नागरिकांना होती. मात्र जिल्ह्यातील लोकांचा अपेक्षा भंग झाल्याचं पाहायला मिळतंय. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी ओरड आहे. महिलांना आणि लहान मुलांना रात्रंदिवस पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरवर्षी टँकरची सोय होते मात्र यावर्षी प्रशासनाच्या नियोजन शून्य ते मुळे पुन्हा एकदा बीड करांना दरवर्षीप्रमाणे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे
बीड जिल्ह्यातील माजलगाव आष्टी पाटोदा या भागांमध्ये पाण्याचं मोठं दुर्भिक्ष पाहायला मिळतं. या मार्गात डोंगर भाग आहे अशा ठिकाणी पाण्यासाठी मोठी वणवण नागरिकांना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात पायपीट सुरू आहे. मागच्या वर्षी निसर्गानं कृपा केली असली तरी प्रशासनाच्या अवकृपेमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.