राज्यातल्या जनतेच्या बँक खात्यात या ना त्या योजनेतून थेट पैसे जमा होतात. मात्र आता काही शेतकरीच 4 पैसे जास्त मिळवायला पिकविम्याच्या नावाखाली सरकारला गंडा घालत आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात 13 हजार 286 शेतकऱ्यांनी 8,910 हेक्टरवर फळबागा लावल्याचं सांगून विमा काढला. मात्र पीक विमा नेहमीपेक्षा जास्त असल्याचा संशय कृषी विभागाला आला. चौकशीअंती 1,498 शेतकऱ्यांनी 805 हेक्टरवर कुठलीही फळबाग लावलीच नाही हे उजेडात आलं. म्हणजे फक्त कागदावर फळबाग दाखवा आणि विम्याची रक्कम मिळवा असा हा प्रकार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बागा फक्त कागदावर, विम्याचे पैसे खात्यात


राज्यातील 73, 787 शेतकऱ्यांचे पिकविम्याचे अर्ज आले आहेत.  45 हजार अर्जांची कृषी विभागाकडून पडताळणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 10,500 अर्जदारांच्या बागा फक्त कागदावर असल्याचं दिसून आलं आहे. तर 14,500 शेतकऱ्यांचे विम्याचे अर्ज बाद करण्यात आले असून 18 हजार अर्जाची पडताळणी अद्याप बाकी आहे. 


या सगळ्या पिक विम्याच्या फसवाफसवीत शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्राच्या काही कर्मचाऱ्यांची साथ मिळत असावी असा संशय कृषी अधिक्षकांना आहे.


जालना जिल्ह्यातही 19 हजार अर्जापैकी 7,217 ठिकाणी फळबागा लावल्याच गेलेल्या नाहीत. 189 ठिकाणी जास्त विमाक्षेत्र दाखवण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातही 939 अर्जापैकी 328 ठिकाणी  बागा फक्त कागदावरच दिसत आहेत. तेव्हा विम्याचे 4 पैसे जास्त मिळवायला काही शेतकरी शासनाला गंडा घालत आहेत. मात्र याचा भुर्दंड प्रामाणिक शेतकऱ्यांना बसू नये म्हणजे झालं.  


या जिल्ह्यात आहेत सर्वाधिक अर्ज 


पिक विमा घोटाळ्यात सर्वात जास्त अर्ज हे सोलापूर जिल्ह्यातून आहेत. सोलापूर जिल्ह्यात कांद्याची लागवड अधिक आहे असं सांगून पीक विमा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 41 हजार 865 इतकी आहे. यामध्ये फक्त 37 हजार 230 हेक्टर एवढ्याच क्षेत्रात कांद्याची पेरणी झाली आहे. कृषी विभागाने यांची तपासणी केली असता यामधील 36 हजार 438 शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली नाहीये असं दिसून आलं.