तुषार तपासे, झी २४ तास, सातारा : हिंदू धर्मामध्ये पिंडाला कावळा शिवल्या शिवाय त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही असं म्हणले जातं. पण साताऱ्यातील गावे आहेत जिथे गेली ३५ वर्ष झाले कोणत्याही अंत्यविधीनंतर पिंडाला कावळा शिवलेला नाही. कशामुळे असं होतंय? काय आहे या मागचं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील जाखीनवाडी परिसरातून कावळाच गायब झालाय. त्याचा परिणाम म्हणजे, या गावांमध्ये मृत्यूनंतरच्या पिंडदानावेळी शिवण्यासाठी कावळाच मिळत नाही. त्यामुळं या भागात गेल्या ३५ वर्षांपासून कावळ्याविना पिंडदान विधी केला जातोय. कावळ्याऐवजी या भागात गायीला पिंड भरवला जातो, असं हिंदुराव पाटील आणि धोंडीराम पाटील या गावकऱ्यांनी म्हटलंय. 


गावकऱ्यांनी पूजा अर्चा केल्या पण कावळे काही या भागात परत आले नाहीत. जाखीनवाडी भागात गेल्या पन्नास वर्षांपासून फक्त ऊस शेती केली जाते. शेत शिवारांमध्ये कावळ्यांना काहीच खायला मिळत नसल्यानं कावळ्यांनी जाखीनवाडीतून आपला अधिवास हलवल्याचा दावा पक्षीप्रेमी सुनील भोईटे यांनी केलाय.


पिंडाला शिवण्यापुरतीच कावळ्यांची भूमिका नाही. कावळा हा निसर्ग साखळीतला सफाई कर्मचारी म्हणून ओळखला जातो. या भागात कावळे गायब होणं, हे पर्यावरणाच्या गंभीर समस्येचं एक लक्षण मानलं जातंय.