कल्याण : शहरात तसेच डोंबिवलीत कोरोनाच्या रुगण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दोन्ही शहरात रुग्ण वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे मोठ्या गर्दीवरुन दिसून येत आहे. काल एकाच दिवसात ३२३ इतक्या रेकॉर्डब्रेक रुग्ण वाढल्याने आणखीनच चिंता वाढलेली आहे. मात्र त्यानंतरही कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला तरी कोण्यात्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. व्यापारीवर्गही मास्क लावतांना दिसत नाहीत. लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे. त्यातच कोरोना रुग्णांत सातत्याने भर पडत आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील कोरोना कसा काय नियंत्रणात येणार हाच खरा प्रश्न आहे.


गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना ठाण मांडून असून त्याला दूर ठेवण्यासाठी काय करावे आणि काय नाही हे सुरुवातीपासून वारंवार सांगितले जात आहे. मात्र त्यानंतरही नागरिकांमध्ये हे नियम पाळण्याऐवजी ते पायदळी देण्याचे काम सुरु आहे. शहरात होणारी गर्दी लक्षात घेता पोलीस आणि आरोग्य यंत्रणा आणि पालिका प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा इतरांच्या जीवावर ही गर्दी बेतू शकते. तर केडीमसी प्रशासन आणि एपीएमसी प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.