येवला : बीएसएफ जवान सुनील धोपे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणानंतर आता आणखी एक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रूक गावचे सीआरपीएफ जवान दिगंबर शेळके यांनी गोळी मारून घेत आत्महत्या केली आहे. तेजपूर इथल्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. मात्र हा घातपाताचा प्रकार असल्याचा आरोप शेळके कुटुंबियांनी केला आहे. गृहखात्यातर्फे योग्य चौकशी करून त्यांना शहीद दर्जा देण्याचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत त्यांचं पार्थिव ताब्यात न घेण्याचा इशारा मानोरीतल्या ग्रामस्थांनी दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेळके यांच्या नातेवाईकांना अधिकाऱ्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती दिली. पण कुटुंबियांनी दिगंबर असे करूच शकत नाही. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पार्थिव पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आले आहे. शेळके हे आसाम मधील तेजपूर येथे आपलं कर्तव्य बजावत होते. रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी गोळी झाडून घेतल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती कळताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. त्यांना १ मुलगा आणि १ मुलगी आहे. 


दिंगबर यांची स्टोर किपर म्हणून नुकतीच नेमणूक झाली होती. मात्र या स्टोरच्या हिशोबाबाबत गोंधळ असल्याने २०१४ पासून चौकशी सुरू होती. शनिवारी रात्री दिंगबर यांनी याबाबत त्यांच्या मेव्हण्यांना देखील सांगितलं होतं. यानंतर काही तासातच त्यांच्या मृत्यूची बातमी आली. नातेवाईकांनी घातपाताचा संशय असल्याचा आरोप करत गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र पाठवले आहे.