Maharashra Politics : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटनमधून महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. तमाम शिवप्रेमींसाठी हा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण. मात्र त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.. यानिमित्तानं पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध फडणवीस वाद पेटलाय. ही वाघनखं खरंच शिवाजी महाराजांची आहेत का, असा सवाल  ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित केला आहे. तर बालबुद्धीला उत्तर देत नाही असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला रवाना झाले आहेत. 


संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही तर वाघनखांवरून राजकीय टोलेबाजी सुरू झालीय. अत्याचा-यांचा कोथळा बाहेर काढणारी शिवसेनेची वाघनखं नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका संजय राऊतांनी केली. तर काही जणांनी शिवरायांचा आदर्श सोडून अफझलखानाचा आदर्श घेतलाय असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.


शरद पवारांची सबुरीची भूमिका


दरम्यान, शिवाजी महाराजांच्या वाघनखांवरुन नेत्यांमध्ये वार-पलटवार सुरू असताना शरद पवारांनी सबुरीची भूमिका घेतलीय.. वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. वाघनखांवरुन वाद निर्माण करण्याची गरज नाही शरद पवारांचा आदित्य ठाकरेंना सल्ला. तर वाघनखं खोटी असल्याचं सिद्ध करा असं आव्हान शिवेंद्रराजेंनी दिले आहे. 


निवडणुका लक्षात घेऊन वाघनखं महाराष्ट्रात आणली जात असल्याचा विरोधकांचा आरोप


वाघनखं मुंबईतून आणण्याच्या टायमिंगवरूनही वाद सुरू झाला आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन वाघनखं महाराष्ट्रात आणली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
ज्या वाघनखांच्या मदतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच ऐतिहासिक वाघनखांवरून एकमेकांचा राजकीय कोथळा बाहेर काढण्याची स्पर्धा राजकारण्यांमध्ये रंगलीय. कोणत्या गोष्टीचं राजकारण करायचं, याचं भान नेत्यांनी ठेवायला हवं.


छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला निघाले


छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनला निघालेत.  ब्रिटनच्या म्युझियममध्ये असलेली ही वाघनखं मुंबईत परत आणली जाणार आहेत. याच वाघनखांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. मात्र त्यावरून राजकारण सुरू झालं असताना मुनगंटीवार वाघनखं आणायला लंडनला रवाना झालेत. त्याआधी मुंबई विमानतळाबाहेर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी मानवंदना दिली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी यावेळी विमानतळ परिसर दुमदुमून गेला.